कल्याण-अमजद खान : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी मे महिन्यात मतदान होणार असले तरी त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलीस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे. निवडणूक गुन्हेगारी आणि भय मुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील 773 जणांकडील अग्निशस्त्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमीनीच्या वादातून उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनातच कल्याण शिंदे सेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात किती जणांना अग्निशस्त्र दिेल आहे याची चर्चा सुरु झाली. कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीत 1 हजार 385 जणांकडे अग्निशस्त्र आहे. त्यांनी पोलीस परवानगी घेऊन अग्निशस्त्र बाळगले आहे. 16 मार्चपासून लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी 1 हजार 385 जणांपैकी 773 जणांकडील अग्निशस्त्र निवडणूक काळापूरते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अग्निशस्त्र जप्त करण्यात आलेल्यांमध्ये राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, 2019 साली कल्याण पोलीस परिमंडळाने 524 जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यंदा 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीकरिता १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी 593 जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 119 जणांच्या विरोधात अजामीन पात्र स्वरुपाची कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या विविध स्वरुपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.