First Patient Of Corona Jn1 Detected In Satara District Health System On Alert Nrdm
सातारा जिल्ह्यात करोना जेएन1 चा आढळला पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
सातारा जिल्ह्यात करोनाने शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.
सातारा : करोनाने पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून, गेल्या दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात करोनाचे रूग्ण आढळून आले होते. मात्र, आता सातारा जिल्ह्यात करोनाने शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे. 35 वर्षीय महिला रुग्णाला येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
सन 2020 मध्ये करोना संसर्गाने भारतात हाहाकार केला होता. यावेळी लाॅकडाऊनही करण्यात आल्याने देशावर मोठे संकट आले होते. त्यानंतर करोना बाधितांमध्ये चढ- उतार पहायला मिळत आला आहे. अनेकदा प्रशासनाने अनेक नियमावली जाहीर करत करोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पुन्हा एकदा गेल्या काही दिवसापासून करोनाने डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला करोनाची लागण झाली असून, तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. करोना रूग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनाचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Web Title: First patient of corona jn1 detected in satara district health system on alert nrdm