सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी पाच जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली आहे. या हल्यात लहान मुलगा, दोन महिला, एक ज्येष्ठ नागरिक हे चौघे जखमी झाले. दरम्यान, या मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.
पाटस परिसरात मुख्य रस्ता तसेच सार्वजनिक ठिकाणी मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, या कुत्र्यांच्या टोळ्याच चौका चौकात पहायला मिळत आहेत. त्याचा नाहक त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांवर ही कुत्री धावून जात असतात, भुंकत अंगावर धावून जात असल्याने नागरिक , महिला ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यी भयभीत होत आहेत.
त्यातच एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी (दि १८) मुख्य रस्त्यावरून येजा करणाऱ्या पाच जणांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतला. यात एका लहान मुलाला दुखापत झाली असून, दोन महिला जखमी झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले. तर दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, ग्रामपंचायत प्रशासनाने आणि संबंधित विभागाने या पिसाळलेल्या कुत्र्याचा आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता होत आहे.