फोटो सौजन्य: Gemini
या गुन्ह्याची सुरुवात सन 2014 पासून झाल्याचे समोर आले आहे. जांबुत खुर्द येथील शरद कैलास डोंगरे यांच्या घरी बाळासाहेब पोटे व त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती आली होती. “तुमचे सर्व काही चांगले करून देतो” असे सांगत त्यांनी घरातील ज्येष्ठ सदस्यांशी गोड बोलून रोख 5 हजार रुपये व एक बकरू घेऊन गेले.
सन 2015 मध्ये पुन्हा पोटे व त्याचा साथीदार डोंगरे यांच्या घरी आले. यावेळी संमोहन करून घरातील आईकडून 1 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर जुलै 2025 मध्ये पोटे याने दोन व्यक्तींना घरी पाठवून आश्रम शाळेसाठी धान्य लागते असे सांगून एक गोणी बाजरी व 600 रुपये रोख रक्कम घेऊन गेल्याचा आरोप आहे.
दरम्यान, डोंगरे कुटुंबातील आईचे तसेच भावजयी दिपाली सुरेश डोंगरे यांचे सुमारे 5 लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याचेही निष्पन्न झाले. या संदर्भात विचारणा केली असता घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. या सर्व प्रकारामुळे कुटुंबातील आईची मानसिक स्थिती बिघडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
जादूटोणा व संमोहनाच्या माध्यमातून सोने, पैसे, बकरू व धान्य असा ऐवज लुटल्याप्रकरणी शरद कैलास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अंतर्गत बाळासाहेब पोटे व सिंधू बाळासाहेब पोटे या जोडप्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहेत.






