Mumbai Metro (Photo Credit- X)
Mumbai Metro Extended Timings: आपण सगळे ज्याची वाट पाहत होतो आज तो दिवस आला आहे. आज बाप्पांचे आगमन झाले आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आता MMRDA मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान, मुंबईकराच्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रोच्या वेळांमध्येही वाढ करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) जाहीर केल्यानुसार, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत मेट्रोच्या लाईन २ए आणि लाईन ७ ची सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि प्रवाशांना सोयीचे व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे.
या दोन्ही मार्गांवर, आधी रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची मेट्रो आता रात्री १२ वाजता सुटेल. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणे सोपे होईल. एमएमआरडीएने सांगितले की, गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांची संख्याही वाढवली आहे.
मुंबईत गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे येतात. अशा वेळी, मुंबई मेट्रोच्या वेळा वाढवल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः जे भाविक रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शन घेऊन घरी परततात, त्यांच्यासाठी ही सुविधा एक वरदान ठरली आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत सेवा सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि व्यवस्थापनाची विशेष काळजी घेतली जाणार आहे. सर्व मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जातील आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जाईल. तसेच, स्थानकांवरील गर्दीचे योग्य नियोजन केले जाईल जेणेकरून कोणत्याही प्रवाशाला त्रास होणार नाही आणि त्यांचा प्रवास सुरक्षित होईल.