सांगली : आम्हाला लोकसभेसाठी शिर्डी आणि सोलापूरच्या जागा मिळाव्यात त्या जागा मिळणे हा आमचा हक्क आहे. आम्हाला या जागा दिल्या नाहीत, तर समाजात नाराजी पसरेल, असे स्पष्ट करीत, जुन्या मित्रांना विसरू नका, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी दिला. सांगलीत ते बोलत होते.
यावेळी रिपाइंचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सचिव सुरेश बारशिंगे, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, जगन्नाथ ठोकळे, अण्णा वायदंडे, श्वेतपद्म कांबळे, सचिन सवाखंडे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, राहुल गांधी यांच्या सभेला लोक येतात, ते त्यांना बघायला येतात. त्याचे रूपांतर मतात होणार नाही. त्यांचे सरकार असताना मनमोहन सिंग यांच्या वेळीच त्यांना पंतप्रधानपद द्यायला हवे होते. आता त्यांना ते पद मिळेल की नाही हे सांगता येत नाही. मुळात राहुल गांधींना भारत जोडण्याची आवश्यकता नाही. ते काम मोदींनी कधीच केले आहे.
जागावाटपात आम्हाला डावलू नये
आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष मोदींच्या मागे ताकदीने उभा आहे. पण मोदींनी जागावाटपात आम्हाला डावलू नये. आमचा मतदार कमी असला तरी, तो निर्णायक आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समिती, स्थानिक समित्यांवर संधी मिळाली पाहिजे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेऊ नये. ॲड. आंबेडकर महाविकास आघाडीत जातील, असे वाटत नाही. आघाडीनेही त्यांना घेऊ नये. ते मोदींविरोधात असले तरी, मी मोदींच्या पाठीशी ठाम आहे, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.
जी जागा मिळेल तिथे मी लढेन
आठवले म्हणाले, शिर्डी आणि सोलापूर या जागा आमच्याच पक्षाला मिळाव्यात, यासाठी आम्ही अमित शहा, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रे दिली आहेत. मी स्वतः शिर्डी किंवा सोलापूरपैकी जी जागा मिळेल तिथे लढेन, असेही सांगितले आहे. फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.