मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा
मंत्रालयातून दूर दृश्य प्रणालीद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच उत्तन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यात एकूण ६० उपप्रादेशिक परिवहन कार्यालये कार्यरत आहेत. मिरा–भाईंदर परिसरातील या कार्यालयामुळे परिवहन विषयक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून, ठाण्याला जावे लागणारे अंतर, वेळ व खर्च वाचणार आहे. मीरा–भाईंदर आणि परिसरातील नागरिकांसाठी परिवहन विषयक सेवा अधिक सुलभ होणार आहेत.
मिरा–भाईंदर महानगरपालिका हद्दीतील विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी–सुविधा आणि सार्वजनिक सेवा अधिक सक्षम होणार आहेत. त्यामध्ये रस्ते, अंतर्गत गटारे, पायवाटा, विविध समाजभवन, सार्वजनिक उद्याने, क्रीडा व व्यायाम सुविधा यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमुळे मिरा–भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी केले तर आभार उपपरिवहन अधिकारी विवेक काटकर यांनी मानले.
तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत कोस्टल रोड आणि मेट्रोच्या विस्तारादरम्यान, एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईत पॉड टॅक्सीचे स्वप्न साकार होणार आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पॉड टॅक्सी प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट शेअर केली. सरनाईक यांनी सांगितले की पॉड टॅक्सी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पुढील सहा महिन्यांत होईल. सध्या, देशात कुठेही पॉड टॅक्सी कार्यरत नाहीत. पॉड टॅक्सी हा केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा स्वप्नातील प्रकल्प आहे. त्यांनी एकेकाळी दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यान पॉड टॅक्सी चालवण्याचे स्वप्न पाहिले होते, जे आता मुंबईत प्रत्यक्षात येत आहे.






