सौजन्य - सोशल मिडीया
मुंबई : रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता पण तसे झाले नाही. आता महामहिम राज्यपाल यांनीच या प्रकरणात लक्ष घालून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या एका बोगस प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठवली असता सचिवालयाने अर्ध्या रात्रीच त्यांची खासदारकी रद्द केली, त्यानंतर त्यांचे शासकीय घरही सोडण्यास भाग पाडले तसेच काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली पण माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय कसा, असा प्रश्न विचारून कोकाटे प्रकरणात सरकार लोकशाही पद्धतीने वागत नाही असे सपकाळ म्हणाले.
शिवरायांचे मावळे आणि संघ स्वयंसेवकांची तुलनाच होऊ शकत नाही..
गोविंदगिरी महाराजांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि संघ स्वयंसेवक यांची तुलनाच होऊ शकत नाही. हा महाराजांचा आणि मावळ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकेला विरोध करणारा विचार हा संघाच्या विचाराशी मुळता जुळता आहे. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या शौर्याबद्दल अफवा पसरवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. मावळ्यांचा विषय जातीच्या पलीकडचा आहे, ते कोणत्या जाती धर्माचे नव्हते तर स्वराज्याच्यासाठी लढणारे छत्रपतींचे सैन्य होते. हेच गोविंदगिरी देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जिरेटोप घालून त्यांना महाराज बनवण्याचा प्रयत्न करत होते. जिरेटोप हे शिवाजी महाराजांचे प्रतिक आहे ते सुद्धा आरएसएस बळकावू पहात आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
महाकुंभमेळ्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, कुंभमेळा हा राजकारणाचा आखाडा नाही त्यामुळे यावर राजकारण नको ही काँग्रेसची भूमिका आहे. पण कुंभमेळा हा काही पहिल्यांदाच होत नाही याआधाही कुंभमेळे झाले आहेत आणि पंतप्रधान व राष्ट्रपती यांनीही त्यात सहभाग घेतलेला आहे. यावेळी मात्र मोदी-योगी यांनी महाकुंभमेळ्याला राजकीय स्वरुप दिले आहे. पण भाविकांसाठी व्यवस्था दिसून आली नाही, चेंगराचेंगरीत भाविकांचे मृत्यू झाले. चांगली व्यवस्था केली असती तर आणखी लोकांना कुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली असती, असेही सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्र एसटी काँग्रेसच्या रक्तदान शिबीरात बोलताना सपकाळ म्हणाले की, एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, ग्रामीण भागात एसटी सेवेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे, ही सेवा चालू राहिली पाहिजे. एसटीमध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्याचा पैसा राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला पाहिजे. एसटी कामगारांच्या वतीने रक्तादानासारखे महत्वाचे कार्य वर्षानुवर्षे सुरु आहे हे कौतुकास्पद आहे असेही सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले एस टी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.