Photo Credit- Social Media भाजप म्हणजे पक्ष खाणारी चेटकीण- हर्षवर्धन सपकाळांनी बोचरी टीका
पुणे: राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर काँग्रेसलाही मोठी गळती लागली आहे. अनेक दिग्ग्जांनी काँग्रेसची साथ सोडत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. पुण्याच्या राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले, काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम करत कमळ हाती घेतले. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या संग्राम थोपटे यांनीदेखील काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याची चर्चेला काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील दुजोरा दिला. पण त्याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजप हा पक्ष खाणारी चेटकीण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काल नवराष्ट्र वृत्तसमुहाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांना थांबण्याचे आवाहनही केले. संग्राम खोपटे यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झालाय का, असा प्रश्न विचारला असता, सपकाळ म्हणाले, तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी नाना पटोले याना प्रदेध्याध्यक्ष पद द्यायचं आणि संग्राम थोपटे यांना विधानसभा अध्यक्षपद द्यायंच असं ठरवण्यात आले होतं. पण रिक्त झालेलं पद ताबडतोब भरले गेले नाही. ते कायदेशीर संकेत आहेत. ती पाळलं जाईल असं वाटलं होतं. पण त्यावेळीही देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व ब्लॉक करून ठेवलं जे नियमबाह्य होतं. याचा अंदाज आम्हाला आला नाही. अशी कोणत्याही राज्याची विधानसभा नसेल जिथे एवढा काळ विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवलं गेलं. गंमत म्हणजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच आठ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या गेल्या.
संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पाठवल्याचं समजत आहे. त्यांनी मेल केला आहे. पण अशा काळात त्यांनी संयमाने घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. संग्राम थोपटे हे उमदं नेतृत्त्व आहे, संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसशी निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी पावलं टाकावीत अशी माझी इच्छा आहे. ही भाजप म्हणजे नेते खाणारी मंडळी आहे, दुसऱ्या पक्षातील नेते घ्यायचे आणि त्यांना संपवायचं ही भाजपची रणनीती आहे. ज्या शिवसेनेसोबत त्यांनी इतके वर्ष युती केली, त्या शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. आता भविष्यातही भाजप अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मुळावर उठतील, हे भविष्यात दिसून येईल. आपल्याकडे एक मुलं खाणारी चेटकीण अशी दंतकथा आहे, तसा हा भाजप पक्ष खाणारी चेटकीण आहे. त्यांच्या गळाला न लागता, संग्राम थोपटेंनी काँग्रेसमध्येच राहावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्याबाबत पक्षाला कोणतीही तक्रार किंवा आक्षेप नाही, असं असतनाना असा निर्णय घेऊ नये. हा काळ बिकट आहे. या काळात संयम आणि संघर्ष हेच महत्त्वाचं आहे.
औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादासंदर्भात तुम्ही फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती, त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर तुमची भूमिका काय आहे,असा प्रश्न विचारला असता, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेब हा क्रुर आहे. त्याची क्रुरता आणि त्याच जे प्रशासन होतं. त्या पद्धतीचे फडणवीसांचं प्रशासन आहे, या दोघांच्या कार्यकाळाची मी तुलना केली होती. औरंगजेबाने जरी संभाजी महाराजांचा छळ केला, आमचा धर्म स्वीकारा नाहीतर मी तुमचा छळ करेल, तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी औरंगजेबाने दिली होती. तसाच छळ आता फडणवीस करत आहे. तुम्ही आमच्या पक्षात या नाहीतर मी तुमच्या मागे ईडी, लावेल सीबीआय लावेल, एकंदरीत दोघांचा कारभार एकसारखाच आहे. हा माझा आशय होता. दोघांची तुलना कारभार आणि प्रशासनाच्या अनुषंगाने केली होती. त्यात काहीच गैर होत नाही.