Heavy Police Presence In Koregaon Bhima Area Cctvs With Drones Will Be Eyes Nrdm
कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोनसह सीसीटीव्हींचा असणार ‘डोळा’
कोरेगाव भीमा ऐतिहासीक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्ताने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे : कोरेगाव भीमा ऐतिहासीक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्ताने तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी चार अप्पर पोलीस आयुक्त, अकरा पोलीस उपायुक्त, ४२ सहायक आयुक्त, ८६ पोलीस निरीक्षकांसह तीन हजार दोनशे अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्या, बॉम्बनाशक विरोधी पथक असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रभारी सहपोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक तारखेला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात. त्यामुळे येथे लाखोंची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पुर्ण झाली आहे.
गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेतल्या असून यंदा विजयस्तंभ अभिवादनसाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. वाहनांना पार्किंग, वाहतूक बदल आदींचे नियोनज करण्यात आले आहे. येणाऱ्या अनुयायी यांच्यासाठी बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकार्यांसह तीन हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलासह बाहेरील जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मागविण्यात आले आहेत.
असा आहे बंदोबस्त
अप्पर पोलीस आयुक्त – ४
पोलीस उपायुक्त – ११
सहायक आयुक्त – ४२
पोलीस निरीक्षक – ८६
सहायक – उपनिरीक्षक – २७१
पोलीस अंमलदार – ३,२००
एसआरपीएफ – ६ कंपन्या
बीडीडीएस – ९ पथके
क्यूआरटी – ३ पथके
Web Title: Heavy police presence in koregaon bhima area cctvs with drones will be eyes nrdm