विदर्भात मुसळधार, नागपुरात कहर (फोटो- सोशल मीडिया)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही प्रतिक्षाच आहे. असे असताना आता पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूल आणि रस्ते कोसळले आहेत. तर डझनभर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नागपूरच्या कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यात आलेल्या पुरात 2 जण वाहून गेले आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. दुसरीकडे, कामठी तालुक्यातील नाग नदीकाठच्या वस्त्यांमध्ये अडकलेल्या 70 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.
काही भागातील वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी साचल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. तर वर्धा जिल्ह्यात 24 तासांत 50 महसूल विभागात मुसळधार पाऊस नोंदला गेला. मुसळधार पावसामुळे 26 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर काही गावांमध्ये अडकलेल्या 4 कामगारांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढले. दिवसभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
उड्डाणपुल सुरू होण्यापूर्वीच कोसळला
कामठी शहरातील रामनगर रेल्वे क्रॉसिंगवर बांधलेला नवीन उड्डाणपुल मार्ग सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या मार्गावर वाहतूक अद्याप सुरू झालेली नव्हती. अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसात रस्ता उडून गेला. दोन ठिकाणी रस्ता कोसळला आणि मोठे खड्डे पडले.
चंद्रपुरात वाहतूक ठप्प
चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पूल आणि रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. ब्रहापुरीत एक विहीर कोसळली, सावलीतील नागभीडमध्ये घरे कोसळली. ब्रह्मपुरीत 11 जणांना शाळेत हलवण्यात आले.