यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
यवतमाळ : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर काही भागांत पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना ऑगस्टमध्ये काहीसा थांबलेला पाऊस बुधवारी (दि. १३) पुन्हा जोरात आणि सर्वत्र धुवाधारपणे बरसला. संपूर्ण जिल्हा झोडपून टाकणाऱ्या या पावसामुळे यवतमाळ शहरात सलग ८ तास जोरदार पाऊस झाला. याच दरम्यान जिल्ह्यातील ४ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, २ मोठ्या जलप्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी आठपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस सायंकाळी साडेचारपर्यंत सारख्याच वेगाने बरसत होता. हवामान विभागाने मंगळवारपासून (दि. १२) तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पहिल्या दिवशी जिल्हावासियांना कडक उन आणि काहिलीने त्रस्त केले. मात्र, बुधवारी सकाळपासूनच यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढणे सुरू केले. यात रस्त्यावरची संपूर्ण वाहतूक दुपारी १२ वाजतापर्यंत एकप्रकारे गायब असल्याचे पाहायला मिळाले. दुपारी पावसाचा सामना करत चाकरमान्यांनी आपापली कार्यालये कशीबशी गाठली.
दरम्यान, वणी ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने अनेकांची गैरसोय झाली. यवतमाळसह घाटंजी, पुसद, राळेगाव, आर्णी, वणी, पांढरकवडा, नेर, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, उमरखेड अशा सर्वच तालुक्यात पाऊस झाला.
जिल्ह्यातील चार धरणे भरली तुडुंब
बुधवारच्या संततधार पावसामुळे जलप्रकल्पांची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील सायखेडा, बोरगाव, नवरगाव आणि वाघाडी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. सायंकाळी ओव्हरफ्लो पाहण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली होती. शेतशिवारातील पीक पाण्याखाली गेल्याचे अनेक ठिकाणी चित्र आहे.
दोन प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बुधवारी बेंबळा आणि इसापूर २ मोठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात बेंबळा प्रकल्पाचे २ दरवाजे उघडले. जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार सायंकाळी ५ वाजता धरणाचे २ दरवाजे २५ सेमीने उघडण्यात आले. तर सायंकाळच्या सुमारास इसापूर धरणाचे ३ गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.