फोटो - सोशल मीडिया
हिंगोली : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी प्रत्येक गटाकडून आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्थात यामध्ये काही वावगे नाही. मात्र, हिंगोलीत दादांच्या राष्ट्रवादीला आपसूकच दोन दिग्गज मोहरे हाती आल्याने पक्षाचे बळ निश्चितच वाढणार आहे.
राष्ट्रवादीच्या पक्षीय फाटाफुटीनंतर वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी तळ्यात-मळ्याची भूमिका घेतली होती. मन साहेबांकडे आणि धन दादांकडे अशीच काहीशी त्यांची अवस्था होती. परंतु, नंतर त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजू नवघरे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे पक्षाला बळ मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
असे असले तरी नवघरे हे क्वचितच हिंगोलीला येतात. त्यामुळे कळमनुरी आणि हिंगोली दोन विधानसभेत पक्ष कमकुवत होत होता. कारण, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्यातील नेत्यांनी राहणे पसंत केले होते.
राष्ट्रवादीची धुरा बांगर यांच्याकडे
अजितदादांच्या राष्ट्रवादीची धुरा बी. डी. बांगर यांच्याकडे सोपवण्यात आली. अर्थात जिल्ह्यात संघटन बांधण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात असताना अपसुकच दोन मोहरे त्यांच्या हाती लागले. त्यातील एक म्हणजे भाजपतून बाहेर पडलेले रामदास पाटील. लोकसभेला उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने शासकीय नोकरी सोडून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. परंतु लोकसभेची जागा शिंदे सेनेकडे गेल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.
लोकसभेची उमेदवारी मागे
तरी देखील लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला. परंतु भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी बंद खोलीत मन धरणी करत त्यांचे मन वळवले. त्यानंतर पाटील यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली होती ही उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनतर 10 हजार 918 मते मिळाली.
तीनही विधानसभा क्षेत्रात दांडगा संपर्क
लोकसभा आणि तीनही विधानसभा क्षेत्रात दांडगा संपर्क असल्यामुळे साहजिकच दादांच्या राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीला सापडलेला दुसरा मोहरा म्हणजे काँग्रेसमधून निवडणुकीपूर्वी बाहेर पडलेले प्रकाश थोरात हे होत. हिंगोली विधानसभा क्षेत्रात प्रकाश थोरात यांचा दांडगा जनसंपर्क आहे. काँग्रेसचे तत्कालीन आमदार भाऊ पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन प्रकाश थोरातच पाहत होते. याशिवाय त्यांचे वडील हिंगोलीचे आमदार होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश थोरात यांनी अपक्ष निवडणूक लढत 23944 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. यामुळे साहजिकच दादांच्या राष्ट्रवादीचे हिंगोलीत बळ वाढणार आहे.
पालिका निवडणुकीत फायदा होणार?
आगामी दोन महिन्यात नगरपालिका निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत रामदास पाटील यांच्या रूपाने शहराचे खडान खडा माहिती असलेले नेतृत्व दादांच्या राष्ट्रवादीला लाभले आहे. अर्थात त्यांच्या अभ्यासाचा पालिका निवडणुकीत मोठा लाभ पक्षाला मिळणार आहे. थेट नगराध्यक्षाची निवडणूक झाल्यास पाटील कदाचित दादांच्या पक्षाचा चेहरा असू शकतात.