पाचगणीत महाकाय वृक्ष उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळले
काटवली (ता. जावळी) येथील नितीन बेलोशे हे आपल्या मालकीच्या मारुती सुझुकी वॅगनआर कारमधून (क्र. MH 11 BV 5925) पाचगणीहून वाईच्या दिशेने जात होते. ते गार्डनजवळ आले असता, समोरून अचानक महाकाय झाड कोसळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अत्यंत चाणाक्षपणा दाखवत तातडीने गाडी थांबवून ती मागे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच क्षणात दुसऱ्या झाडाची अजस्त्र फांदी त्यांच्या गाडीवर कोसळली. यासोबतच विजेच्या ताराही गाडीवर तुटून पडल्याने कारमध्येच बेलोशे अडकून पडले. कारची काच फुटल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
याच कारच्या अगदी पाठीमागे धनंजय कासुर्डे हे आपल्या ॲक्सेस दुचाकीवरून (क्र. MH 11 CD 4089) चालले होते. त्यांच्याही दुचाकीवर झाडाची फांदी पडली, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून चालत्या गाडीवरून बाजूला उडी मारल्याने ते सुखरूप राहिले. याच ठिकाणी रस्त्याकडेला असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली विनोद गुलाबराव कासुर्डे-पाटील यांची चहाची टपरी होती. बाहेर काहीतरी अघटित घडत असल्याचा मोठा आवाज ऐकून ते तातडीने टपरीबाहेर धावले आणि त्याच क्षणात दोन्ही महाकाय झाडे त्यांच्या टपरीवर कोसळली. या दुर्घटनेत बेलोशे यांची चारचाकी, कासुर्डे यांची दुचाकी आणि चहाची टपरी यांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचगणी नगरपालिकेची टीम, ‘एसओएस’ (SOS)चे सदस्य आणि महावितरणचे कर्मचारी यांनी पावसातच घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या नितीन बेलोशे यांना कर्मचाऱ्यांनी शिताफीने बाहेर काढले. मुख्य रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाई-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. पालिकेने तात्काळ महाबळेश्वर बाजू कडून येणारी वाहतूक न्यू इरा स्कूलमार्गे वळवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सकाळच्या रिमझिम व धुक्यामुळे मदतकार्यात पालिका कर्मचाऱ्यांना सुरुवातीला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. कटरच्या साहाय्याने झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.
पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात पावसाळ्यात अशा दुर्घटना वारंवार घडत असून, याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटकांना बसत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा धोकादायक आणि जीर्ण झालेल्या झाडांचे सर्वेक्षण करून पालिका व महसूल विभागाने ती वेळीच हटवणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आतातरी जागे होऊन भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.






