कोल्हापूर : ‘शिवसेनेसाठी 36 वर्षे माझे योगदान दिले असून, कोल्हापूर जिल्ह्यात मी शिवसेना घडवली आहे. शिवसेना सोडलेली नाही, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मी एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पठ्ठा आहे. तुम्हाला सोडणार नाही’, असा गर्भित इशारा शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी रविकिरण इंगवले यांना दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले असल्याने एकनाथ शिंदे गटाला राजेश क्षीरसागर यांनी समर्थन दिले आहे. या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला होता. तर आज शनिवारी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवालय कार्यालय आवारात असलेल्या डिजिटल फलकावरील राजेश क्षीरसागर यांचा फोटो फाडून टाकला होता. याचे पडसाद शहरात उमटले असून, वातावरण तापले आहे. रविकिरण इंगवले यांनी फाडलेल्या पोस्टरनंतर राजेश क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया तीव्र शब्दांत व्यक्त केली आहे.
रविकिरण इंगवले हा स्वतःला एक गुंड समजतो; पण तो गुंड असला तरी मी सुशिक्षित गुंड आहे. दुसऱ्याने केलेला गुन्हा आपण केला, असे भासवून तुरुंगात गेला. पण त्यांना माझा इशारा आहे. माझे पोस्टर फाडत आहात पण मी बाहेर पडेन, तेव्हा तुमची पळता भुई थोडी होईल. वैयक्तिक दोषाचा फायदा घेत असलेल्या अशा गुंडाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठीशी घालू नये. मी कमजोर नाही. एकनाथ शिंदेचा पठ्ठा आहे, असा गर्भित इशारा शेवटी त्यांनी दिला आहे.