खासदार नारायण राणे
कुडाळ : कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांची १५ जून रोजी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या विजयानंतर या कोकणातून शिवसेना पूर्णपणे संपवली. मी आडवे आले तर साफ करतो. आता या ठिकाणी कोणाला शिरू देणार नसल्याचा टोला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी विरोधकांना लगावत या निवडणुकीनंतर आम्ही जागृत झालो असून आता राज्यातही आमचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आता यापुढे सर्व निवडणुकांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमचाच विजय निश्चित आहे, असाही विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजू राऊळ, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संदीप कुडतरकर, रणजित देसाई, अस्मिता बांदेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, विनायक राणे, रुपेश कानडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात माझा झालेला विजय हा जनतेचा विजय आहे. मी निमित्त मात्र आहे असे राणे यांनी सांगत विजयासाठी प्रयत्न करणारे मतदार, महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार त्यांनी मानले. तसेच पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन असेही राणे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे लोकसभेची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे ही आभार त्यांनी मानले. माझ्या विजयासाठी माझे मुलगे निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांनी दिवस-रात्र दोघांनी फार मेहनत घेतली. माझ्या पत्नीने अनेक सभा, बैठका केल्या या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे.
पुढे ते म्हणाले की, निवडणुकीत विरोधकांनी अनेक विविध प्रयत्न माझ्या विरोधात केले. अनेक डायलॉग केले होते. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी तर सांगितले होते की, आता आमचा विजय हलका झाला आहे. परंतु,आता मी विजयी होत त्यांना हलके केले हे समजले असेल, त्यांनाही दीर्घायुष्य लाभो असाही टोला त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना लगावला. मतदारांनी मला विजयी केल्यानंतर आता माझा आत्मविश्वास अधिक वाढला असून या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मी कार्य करीत राहणार आहे. आता रत्नागिरीचे पाच प्रश्न मी हाती घेतले असून यामध्ये रत्नागिरीतील महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी मुख्यमंत्री आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे. तसेच येथील पाणी, रोजगार, विमानतळ वाहतूक, पर्यटन आणि चिपळूणमधील पूरस्थिती हे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम काम करणार आहे असे राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्गमधील सीवर्ल्ड, रिफायनरी तसेच कोकण किनारपट्टीवरील टॉय ट्रेन हे प्रकल्प लवकरच सुरू करणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी सांगितले की, याबाबत भाष्य करायचं नाही आहे पक्ष नेतृत्व महाराष्ट्रासाठी, कोकणासाठी जी देईल ती जबाबदारी घेऊ असे सांगत मंत्रिपदाबाबत त्यांनी बोलणे टाळले. कोकणातील मुस्लिम बांधव आमच्यासोबत असून आमच्या सोबतच राहणार, मात्र मातोश्रीमध्ये मुस्लिम लोकांबद्दल काय शब्द बोलला जातो तो शब्द मला माहित आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.