पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. वसंत मोरेंनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखवली. परंतु त्यांनी कधी पक्षांतर्गत नेत्यांची नावे घेतली नव्हती. प्रत्यक्ष कोणाचेही नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र वेळ आल्यावर आपण नावं उघड करू, असं वसंत मोरे यांनी या पूर्वीच म्हटले होते.
दरम्यान राज ठाकरे यांच्या २२ मे रोजी झालेल्या सभेत मोरेंनी स्वतंत्र बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचदिवशी त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? अशा शब्दात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. आता मात्र वसंत मोरे यांनी मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्यावर थेट नाव घेऊन आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.
वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?
बाबू वागस्कर यांनी मोरेंचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांना मनसे माथाडी कामगार शहराध्यक्ष पदावरून काढून टाकल्याने मोरेंनी आपली खदखद व्यक्त केली आहे. मोरे म्हणाले, प्रत्येक वेळी वसंत मोरेंनीच का माघार घ्यायची? प्रत्येक वेळी मीच पावले मागे घ्यायची? आणि यांनी फक्त घेतल्यासारखं दाखवायचं,असं आता होणार नाही. माझा बांध फुटणार आहे. पण मी पक्ष सोडणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले आहेत.
[read_also content=”सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान https://www.navarashtra.com/maharashtra/well-known-film-writer-sanjit-narvekar-to-dr-v-awarded-the-shantaram-lifetime-achievement-award-nrdm-286307.html”]
२२ मे रोजी गणेश कला क्रिडा संकुल येथे झालेल्या मनसेच्या सभेत आपल्याला जाणीवपूर्वक बोलू दिले नाही, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. आपल्याला भाषणाची संधी दिली गेली नाही. मंचावर जे नेते बोलत होते, त्यापैकी अनेकांपेक्षा मी नक्कीच वरिष्ठ होतो, माझ्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा तयार होती. स्क्रिप्ट अजूनही गाडीत पडून आहे. माझा आता नक्कीच बांध फुटेल. पण आता तरी पक्ष सोडण्याचा माझा विचार नाही, अशी खदखद वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.