राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधून मंत्रिमंडळामध्ये सामील होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मी कुणाला खुश करण्यासाठी निकाल दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशांनुसारच निकाल दिला. भारतातील कोणत्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे . त्यावर आता राहुल नार्वेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याचिका गेली म्हणजे निकाल चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही, निकालात काय चुकीचं आहे हे न्यायालयाने दाखवून द्यावं लागेल, असं देखील राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील आपला निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही.






