सुरक्षेचे नियम धाब्यावर, मंत्री-आमदारांनाच शिस्तीची गरज; पोलिसांच्या गोपनीय अहवालात नेमकं काय?
या सर्व प्रकरणानंतरही नागपूच्या हिवाली अधिवेशनात अध्यक्षांनी लागू केलेले नियम मंत्री आणि आमदारांकडूनच पायदळी तुडवल्याचे समोर आले. राज्याच्या आमदार आणि मंत्र्यांनीच नियमांचे उल्लंघन केल्याचा गोपनीय अहवाल विधीमंडळ सुरक्षा पोलिसांनी अध्यक्षांकडे सादर केला आहे.
राज्याच्या उपराजधानीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची ( Maharashtra Winter Session) सुरूवात झली. पहिल्याच दिवशी विधीमंडळातील १५ सदस्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला विनापास प्रवेश दिला. विनापास प्रवेश करणाऱ्यांमध्ये विधान परिषेदेतील ३ आमदारच होते. तर इतर १२ सदस्य हे विधानसभेचे आमदार होते. त्यात एक कॅबिनेट मंत्रीदेखील होते.
विधानपरिषेदेतील परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांनी पास नसलेल्या व्यक्तीना विधीमंडळ परिसरात प्रवेश दिला, असा आरोप सुरक्षा पोलिसांकडून करण्यात आला आहे. हा अहवाल हाती आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सुरक्षेचे नियम खुद्द सदस्यांकडूनच मोडण्यात आल्याने आता याप्रकरणी कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.
हिवाळी अधिवेशनात विधीमंडळातील सुरक्षेचे नियम वारंवार मोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पहिल्याच दिवशी 15 सदस्यांनी तर दुसऱ्या दिवशी आणखी 8 सदस्यांनी विनापास व्यक्तींना सोबत घेऊन विधीमंडळात प्रवेश दिल्याचा अहवाल सुरक्षा पोलिसांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.
दुसऱ्या दिवशी उल्लंघन करणाऱ्यांमध्ये आमदार राजू कोरमोरे (1 व्यक्ती), प्रकाश सुर्वे (2 व्यक्ती), महेश शिंदे (1 व्यक्ती), प्रवीण तायडे (1 व्यक्ती), किशोर जोरगेवार (1 व्यक्ती), सिद्धार्थ खरात (1 व्यक्ती) आणि मंत्री अशोक उईके (1 व्यक्ती) यांचा समावेश आहे, असे सुरक्षा अहवालात नमूद आहे. सदस्य आणि विशेषतः मंत्र्यांकडूनच सुरक्षा नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असल्याने, विधीमंडळात शिस्त लावण्याची गरज अधिक ठळकपणे समोर येत आहे.






