सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/प्रगती करंबेळकर : गणेशोत्सवाच्या तयारीने पुणे शहरातील बाजारपेठा, गल्लीबोळ, तसेच मूर्तिकारांच्या कार्यशाळा सध्या बाप्पाच्या विविध रूपांनी सजले आहेत. परंपरा जपत नव्या कल्पनाशक्तीचा वापर करत मूर्तिकार दरवर्षी बाप्पाला नव्या स्वरूपात साकारत आहेत. यंदा बाप्पाच्या साजशृंगारात विशेषतः फेटे, पगड्या, बासरी, त्रिशूल, मोरपिसं व कलात्मक दागिन्यांचा वापर वाढला आहे. पूर्वी गणेशमूर्ती केवळ रंग आणि मखमली शेल्याने सजवली जायची. मात्र, अलीकडच्या काळात मूर्तींच्या साजशृंगारात क्रांती झाली आहे. मूर्तिकार कोल्हापुरी, शिंदेशाही, पेशवाई, राजस्थानी फेटे, विविध रंगसंगतीत वापरून गणेशमूर्ती अधिक देखण्या बनवत आहेत.
यंदा ‘बालगणेश’ विशेष आकर्षण
पुण्येश्वर आर्ट्सचे प्रसिद्ध मूर्तिकार सनी ढगे यांनी सांगितले की, यंदा बालगणेशाच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. लहानसे, गोंडस, निरागस रूप असलेल्या बालगणेशाच्या मूर्ती सर्व वयोगटातील भाविकांना आकर्षित करत आहेत. काही मूर्तींमध्ये बालगणेश बासरी वाजवत आहे, तर काही ठिकाणी कृष्णरूपात झुलताना दिसतो.
संकल्पनात्मक मूर्तींचा भरगच्च संग्रह
यंदाच्या गणेशमूर्तींच्या संकल्पनांमध्ये मोठा वैविध्यपूर्ण बदल पाहायला मिळतो.
त्यामध्ये वारकरी गणपती, कृष्णरूप बाप्पा, शंकर व नृसिंह रूपातील गणेशनाग, मोर, गरुडावर विराजमान मूर्ती यांचा समावेश आहे. या मूर्तींमध्ये धार्मिकतेबरोबरच सांस्कृतिक विविधतेचा संगमही जपलेला दिसतो.
किमतींत ३० ते ३५ टक्के वाढ
अशा सजावटीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त साहित्यामुळे मूर्तींच्या किमतीत यंदा ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २ फूट पीओपी मूर्ती ३,००० ते ४,००० दरम्यान तर शाडूच्या मूर्ती अधिक महाग आहेत. पर्यावरणपूरकतेमुळे मागणी जास्त आहे. मूर्तिकार सनी ढगे म्हणाले, “जरी खर्च वाढला असला तरी लोकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. लोक संकल्पनात्मक आणि आकर्षक मूर्तींना प्राधान्य देत आहेत.”गणेशोत्सवाच्या निमित्ताने परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ असलेल्या या मूर्ती पुणेकरांच्या गणेशभक्तीला एक वेगळीच झळाळी देत आहेत.
कसबा गणपती मंडपात यंदा पाली बल्लाळेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती
गणेशोत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पुण्याचा मानाचा पहिला आणि शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती मंडळ यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांसाठी एक आगळीवेगळी आणि आध्यात्मिक अनुभव देणारी संकल्पना घेऊन येत आहे. रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिराची भव्य प्रतिकृती यंदा कसबा गणपतीच्या मंडपात उभारली जाणार आहे. त्यामुळे पुण्यातच ग्रामदैवत व अष्टविनायकाचे दर्शन एकाच ठिकाणी घडणार असून, लाखो गणेशभक्तांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.