कासेगाव येथे लाखो रूपयांचा अवैध खतसाठा जप्त; जिल्हास्तरीय पथकाकडून धडक कारवाई
पंढरपूर : जिल्हा अधीक्षक, कृषि अधिकारी, सोलापूर यांना बुधवारी (दि.३०) गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीनुसार, मे. महालक्ष्मी फर्टीलायझर्स एलएलपी कासेगाव (ता. पंढरपूर) येथे अवैधरित्या खत उत्पादन व विक्री केली जात असल्याचे समोर आले. त्यानुसार, जिल्हा परिषद सोलापूर तथा जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत लाखोंचा अवैध खतसाठा आढळून आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हरिदास हावळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर तथा जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख तसेच पथकातील सदस्य सावंत, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) माळशिरस, बोंगे, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) मंगळवेढा व सुमित यलमार, कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) पंढरपूर यांनी गुरुवारी (दि.३१) च्या अनुषंगाने रात्री नऊ वाजता तपासणी करून पंचनामा केला. त्यावेळी त्रुटी व खत नियंत्रण आदेश आणि तरतुदींचे उल्लघंन केल्याचे दिसून आले. यामध्ये खत उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले कच्चा मालाच्या खरेदी करण्याबाबतचा परवाना अधिकारी तथा कृषि संचालक, कृषि आयुक्त कार्यालय यांच्याकडे खत आवंटन मंजुरीचे विहित आदेश नाही.
हेदेखील वाचा : Pune Crime : महापालिका वाहनतळाच्या परिसरात बड्या जुगार अड्ड्यावर छापा; पोलीस फौजदारच जुगार खेळताना सापडला
तसेच केंद्र शासनाच्या आयएफएमएस प्रणालीवरील आयडीनुसार खत खरेदी न करता अन्य अवैध मार्गाचा अवलंब करून व खत नियंत्रण आदेश तरतुदींचा भंग करून संशयित मिश्र खताचे वितरण व विक्री करणे, इतरत्र उत्पादन केलेला माल दुसऱ्या विक्रेत्याच्या बॅगमध्ये भरून अवैधरित्या भरून विक्री करणे, कोणत्याही प्रकारची खरेदी, विक्री, उत्पादन, वितरण व व्यवस्थापनविषयक अभिलेखाच्या अद्ययावत नोंदी न ठेवणे, उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली स्वतःची यंत्रसामुग्री बंद असताना इतरत्र उत्पादित केलेला माल गोदामात आणून उतराई करताना दिसून येणे व सदर माल परत स्वतःच्या व अन्य विक्रेत्यांच्या परवान्यानुसार केलेल्या बॅगमध्ये भरताना व सिलिंग करताना दिसून येणे आदी विविध त्रुटी आढळून आल्या.