मॉर्निंग वॉकचा 'तो' दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू (संग्रहित फोटो)
नारायणगाव : नारायणगाव हद्दीत धनगरवाडी (ता. जुन्नर) जवळ पायी (मॉर्निंग वॉक) चालणाऱ्या ४७ वर्षीय महिलेला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१) घडली. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
आशा नामदेव शेळके (वय ४७, रा.धनगरवाडी ता. जुन्नर, पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद विनोद एकनाथ शेळके यांनी दिली. नारायणगाव पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (दि.१) सकाळी ६. ४० वाजताच्या सुमारास नारायणगावच्या हद्दीत ओझर-नारायणगाव रोडवर आशा शेळके व कौशल्या बागुजी बेनके या रस्त्याने पायी चालत जात होत्या. या पायी जात असताना अज्ञात ट्रॅक्टर चालकाने धडक दिली.
हेदेखील वाचा : Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
या धडकेत आशा शेळके यांचा मृत्यू झाला तर कौशल्या बेनके यांचे उजव्या हातात मार लागला असून, यातील मयत आशा शेळके यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर धनगरवाडी परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावर रास्ता रोको केला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे. आय. पाटील हे करत आहेत.
दोन्ही कारची एकमेकांना जोरदार धडक
दुसऱ्या एका घटनेत, गडचांदूर येथून सिमेंट भरून घुग्घुसकडे येणाऱ्या भरधाव वाहनाने घुग्घूस येथून कोरपनाकडे जाणाऱ्या कारला धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. कारमधील ३ जण गंभीर जखमी झाले. याच अनियंत्रित कारने एका सलूनला जोरदार धडक दिल्याने सलून चालकाचा जागीच मृत्यू झाला. सलूनला धडक देताना वाहनाने जवळच्या हॉटेलचेही नुकसान केले. हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. ३१) दुपारी ३ वाजताच्या सुमारास धानोरा पॉईंटवर घडली.
हेदेखील वाचा : Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना






