(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सातारा/तेजस भागवत: आज स्वराज्याची राजधानी सातारा येथे साहित्यिकांचा मेळा भरला आहे. सातारा जिल्ह्यात यंदा ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. काल ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली आहे. तर आज मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सातारा जिल्ह्यातील शाहू स्टेडियमवर आज ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मिलिंद जोशी, मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले आणि अन्य ज्येष्ठ मंत्री आणि मान्यवर उपस्थित असणार आहेत. आज दुपारी हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षयेखाली कवीसमेलन आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. या वेळी पोलीस बँडने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन मानवंदना दिली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते.
दुपारी तीन ते पाच या वेळेत बाल कुमार वाचक कट्टा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी आठ वाजता सुप्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांचे शिकायला गेलो एक हे हास्यविनोदी नाटक होणार आहे. साताऱ्यात होणारे शतकपूर्व साहित्य संमेलन ‘न भूतो न भविष्यती’, असे होणार असल्याचा संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
संमेलनात मुख्य मंडपाबरोबरच ग्रंथप्रदर्शन, कविकट्टा, गझलकट्टा, बालकुमार वाचनकट्टा, प्रकाशन कट्टा असे वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. त्यासाठी आकर्षक मंडप उभारण्यात आले आहेत. दररोज विविध साहित्यिक कट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहणानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. बालकुमार वाचनकट्टा या लहान मुलांच्या व्यासपीठाच्या उद्घाटनावेळी बालगोपाळांची मोठी उपस्थिती होती.






