फोटो सौजन्य - Social Media
राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरतपासाचे आदेश दिल्यानंतर शेख कुटुंबीयांच्या आशा पुन्हा उजळल्या आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जमील शेख यांच्या मुली जोबिया आणि जायरा यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन त्यांच्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले. या प्रकरणाला विधानसभेत आवाज देऊन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानेच फेरतपासाची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
जोबिया आणि जायरा यांनी सांगितले की, “आमच्या आक्रोशाला न्यायाच्या दिशेने वळविण्याचे काम डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. मुख्यमंत्र्यांनीही आमच्या व्यथेची दखल घेत तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आम्ही त्यांच्या ऋणी आहोत.” त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र तयार केले असून, ते पत्र डॉ. आव्हाड यांच्यामार्फत फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंतीही केली.
शेख कुटुंबीयांचा लढा विधिमंडळात लढल्याबद्दल दोघींनी डॉ. आव्हाड यांना पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तो नम्रतेने नाकारत “ये तो बस अंगडाई है, और लडाई अभी बाकी है,” असे म्हणत लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट केले. आव्हाड यांनी तपासाच्या पूर्वस्थितीकडे लक्ष वेधले आणि हे प्रकरण पोलीसांनी योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा आरोप केला.
“जमील शेख यांच्यावर 2014 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ‘आका’चे नाव घेतले होते, तरीही कारवाई झाली नाही. आजही मुख्य सूत्रधार मोकळा आहे,” असे सांगत डॉ. आव्हाड यांनी पोलिसांवर आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांनी तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे सांगून तपास एका व्यक्तीकडे न देता तीन अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
शेख कुटुंबीयांनी या लढ्यात त्यांना साथ देणाऱ्या वैभवी देशमुख यांचेही आभार मानले. तसेच, त्यांनी सध्या तपास करत असलेल्या अधिकाऱ्यावर अविश्वास व्यक्त करून, चौकशी योग्य अधिकाऱ्यांच्या हाती सोपवावी, असेही सांगितले. आता त्यांच्या न्यायाची आशा मुख्यमंत्र्यांकडे लागून आहे.