संग्रहित फोेटो
आमदार विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास ते ज्या पक्षात निवडणूक लढवतील तेथे त्यांचा प्रचार करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अखेर आज एका हॉटेलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्री गोरे म्हणाले, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. समन्वयक या नात्याने माझ्यावर नाराजी व्यक्त होणे साहजिक आहे. सर्वांच्या समन्वयाने चर्चेअंती योग्य मार्ग निघेल. जागा वाटपावर मी कधीही भाष्य केले नाही. सोलापूर महापालिकेचे सर्व उमेदवार स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष ठरवतील. माझा एकही उमेदवार मी सुचविला नाही. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार आहे.
एकमेकांच्या मतदारसंघात जागांची मागणी करणे हे मुख्य कारण आहे, त्यावरही मार्ग निघेल. उमेदवारांच्या नावासंदर्भात ही चर्चा झाली. त्यातून सगळे मिळून निर्णय घेणार आहोत. भाजपा हा मजबूत पक्ष आहे. प्रत्येक आमदारांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे नाराजी उमटणे साहजिक आहे. भाजपची ताकद प्रचंड आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. आम्ही सर्व मिळून व्यवस्थित मार्ग काढणार आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.
महायुती करण्यासंदर्भातही स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष हेच निर्णय घेणार आहेत. जे काही चांगलं होईल ते आमदार आणि वेगळं काही झालं तर ते पालकमंत्र्यांनी केलं असं मानता येईल, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. भाजपातील बहुतांश कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. राजकारणात गणिते बसवावी लागतात. राजकारण आणि युद्धात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. बहुतांश उमेदवार हे निष्ठावंत कार्यकर्तेच असतील, असेही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
महायुती होणार का या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले, मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती संदर्भात प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज नाही. शिवसेना शिंदे गटाने युतीचा प्रस्ताव दिला आहे. या सदर्भात आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केली. मित्रपक्षाने ज्या जागा मागितल्या ते देणं शक्य आहे का याचाही विचार करण्यात येईल. महायुती करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर रिपाइं आठवले पक्षानेही जागांची मागणी केली आहे. युती करीत असताना मित्रपक्ष कोणत्या जागा मागतात यावरही निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपाचे जिथे सक्षम उमेदवार आहेत तिथेच मित्रपक्षाने मागणी केली तर त्याचा विचार करावा लागेल. भाजपाच्या उमेदवारांची एकत्र एकच यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.






