ewelery worth twenty lakhs stolen from the house of a
पुणे : घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच वानवडीत एका व्यावसायिकाच्या घरातून अज्ञाताने २० लाखांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बनावट चावीने कुलूप उघडून अज्ञाताने चोरी केली. तब्बल दोन महिन्यानंतर हा प्रकार समोर आला असून, याबाबत व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सनत सोलंकी (वय ४१, रा. वानवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञतावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा वानवडी येथे केदारी पेट्रोलपंप जवळील ग्रीनव्हॅली सोसायटीत सॅन्डलवुड अपार्टमेंट येथे फ्लॅट आहे. ते व्यावसायिक आहेत. दरम्यान, त्यांचा फ्लॅटला कुलूप होते. ते बाहेर गावी गेले होते. यादरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांचा फ्लॅट बनावट चावीने उघडला व आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे ड्रॉवर देखील त्याने बनावट चावीने उघडून २० लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने चोरी करून नेले आहेत. उपनिरीक्षक संतोष गायकवाड याचा तपास करत आहेत.
एरंडवणा भागात भरदिवसा फ्लॅट फोडला
एरंडवणा येथील ज्येष्ठ नागरिकाचा फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडला असून, त्यांच्या घरातून दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जानेवारीला सकाळी पावणेदहा ते साडेअकरा या वेळेत घडला.
बेडरूमच्या बाल्कनीमधून घरात केला प्रवेश
एरंडवणा येथील भरतकुंज कॉलनी येथे उषा अपार्टमेंटमध्ये तक्रारदाराचा राहता फ्लॅट उघडा असताना, अनोळखी व्यक्तीने फ्लॅटच्या बेडरुमच्या बाल्कनीमधून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र कपाटाची व लॉकरची चावी असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेला. उपनिरीक्षक पंकज पवार याचा तपास करत आहेत.