बंद घराचे कुलूप तोडून चार लाखांच्या दागिन्यांची चोरी (संग्रहित फोटो)
अकलूज : घरी कुणी नसल्याचे पाहून बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी दिवसाढवळ्या चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना माळीनगर नजीकच्या सवत गव्हाण येथे सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणाची तक्रार अकलूज पोलिस ठाण्यात दाखल झाली असून, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.
सवत गव्हाण येथील दयानंद जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये ते अकलूज येथील आर. बी. एल. बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर काम करतात. ते सोमवारी सकाळी दहा वाजता कामावर गेले व त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांच्या पत्नी माधुरी या पतीचा डबा देण्यास अकलूजला गेल्या. त्यावेळी सुमारे 11.45 च्या सुमारास त्यांना सवत गव्हाण येथील त्यांच्या मैत्रिणीने फोन करून माहिती दिली. यामध्ये दोन अज्ञात लोकांनी घराची कडी, कोयंडा व कुलूप तोडून काहीतरी घेऊन दुचाकीवरून निघून गेले आहेत.
दरम्यान, हे समजताच जाधव पती-पत्नी परत सवत गव्हाण येथे येऊन पाहतात, तर त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाट उघडून पाहिले असता त्यांचे सुमारे 7 तोळे सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कर्णफुले, ठुशी, मनी, डोरले असा ऐवज चोरीस गेल्याचे दिसले. आता याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अनेक भागांत चोरीच्या घटना
राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्दळीच्या ठिकाणी दुकानात चोरी करून पसार झालेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चोरी करणारा आरोपी स्वतः व्यवसायाने सोनार आहे.