कल्याण ग्रामीणच्या आमदारांनी केली उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kalyan-Dombivli water Issue News Marathi: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. वाढते नागरीकरण पाहता उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण होते. त्यावर मात करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरासाठी नवे धरण हवे असल्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या प्रसंगी मंत्री भरत गोगावले आणि आमदार शरद सोनावणे उपस्थित होते.
कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या वाढत आहे. आजमितीस दोन्ही शहरांसह कल्याण ग्रामीणमधील २७ गावे धरुन २० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. त्याचबरोबर मोहिली, बारावे आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रे आहे. ही योजना राबविण्यात आली तेव्हा २७ गावे महापलिकेत नव्हती. २७ गावे २०१५ साली समाविष्ट केली गेली. २७ गावांकरीता पाणी वितरण सक्षम करण्यासाठी अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र २७ गावांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्या पोटी महापालिका एमआयडीसीला पाण्याचे बिल अदा करते.
उन्हाळ्यात नागरीकांना पाणी टंचाईच्या झळा पोहचतात. त्यावर तोडगा काढण्याकरीता स्वतंत्र धरण हवे. महापालिका उल्हास आणि काळू नदीतून पाणी उचलून ते शुद्ध करुन नागरीकाना पुरविते. उल्हास नदीतून पाणी उचलण्याचा कोटा राज्य सरकारने ठरवून दिला आहे. मात्र मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी महापालिका उचलते. पाण्याची भविष्यातील गजर पाहता जलसंपदा विभागाकडून अभ्यास करुन अहवाल मागविण्यात यावा. त्या अहवालानुसार उच्चस्तरीय मान्यता देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. धरण बांधण्यासाठी फिजीबिलिटी रिपोर्ट तयार करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्याकरीता महापालिका आयुक्तांना तसे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार मोरे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.