कर्जतमध्ये भूतीवली नळपाणी योजनेचे तीनतेरा, ग्रामस्थ पितात दूषित पाणी
कर्जत : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीसाठी भारत निर्माण योजनेतून नळपाणी योजना राबविण्यात आली होती. भूतीवली गावासाठी असलेल्या नळपाणी योजनेतून सध्या आसल आणि भूतीवली या दोन गावांबरोबर तसेच या ग्रामपंचायती मधील अन्य सहा आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. या नळपणी योजनेच्या पाणी साठवण विहिरीला छिद्र पाडण्यात आली असून नाल्यात वाहणारे दूषित पाणी हे त्या विहिरीत जात आहे. त्यानंतर त्या विहिरीतील साठून राहिलेले पाणी सहा आदिवासी वाड्या आणि दोन गावांना पाठवले जात असल्याने दूषित पाण्यामुळे आमचे आर्पग्य धोक्यात आले असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच यशवंत कोंडे यांनी केली आहे.
आसल ग्रामपंचायती मधील भूतीवली गावासाठी भारत निर्माण योजनेमधून नळपाणी योजना मंजूर झाली होती. २००८ साली मंजूर झालेल्या या नळपाणी योजनेचे काम प्रत्यक्षात २०११ मध्ये सुरु झाले.पाली भूतीवली धरणाच्या पायथ्याशी या पाणी योजनेचे उद्भव विहीर असून काही वर्षांपूर्वी भूतीवली गावासाठी असलेल्या या नळपाणी योजनेच्या उद्भव विहिरी मधून आसल गावासाठी पाणी पुरवठा करण्यात येऊ लागला.या दोन्ही गावांना सुरळीत पाणी पुरवठा होत असताना आसल ग्रामपंचायती मधील आदिवासी वाड्यांचा पाणीप्रश्न गंभीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आसल ग्रामपंचायती मधील सागाची वाडी,चिंचवाडी,भूतीवली वाडी,बोरीचीवाडी,धनगर वाडा,नाण्याचा माळ यांना पाणी पुरवठा देण्यासाठी जलवाहिन्या टाकल्या. मात्र त्या जलवाहिन्या मधून पाणीपुर्वतः होण्यासाठी उद्भव विहीर खोदण्यात आली नाही.त्यामुळे एकाच उद्भव विहिरींमधून दोन गावे आणि सहा वाड्या यांना पाणी पुरवठा सुरु होता.
परंतु कोणत्याही एक किंवा दोन गावांसाठी असलेल्या नळपाणी योजनेसाठी एक उद्भव विहीर पुरेशी असते. मात्र एकावेळी दोन गावे आणि सहा वाड्या यांच्यासाठी एक उद्भव विहीर अपुरी पडत असल्याने उद्भव विहिरी मध्ये साचून राहणारे पाणी हे अपुरे पडत असल्याने डोंगरावर असलेल्या सहा आदिवासी वाड्या येथे असलेल्या नळाला पाणी पुरेसे पोहचत नव्हते. त्यामुळे कोणीतरी उद्भव विहिरीमध्ये नाल्याचे पाणी जावे यासाठी भोके पाडली आहेत.त्याचा परिणाम नाल्यातील पाणी त्या उद्भव विहिरीमध्ये हवे तेव्हडे जात असून थेट नाल्यातील पाणी विहिरीत जात असल्याने त्या उद्भव विहिरी मधील पाणी दूषित झाले आहे.गेली काही महिने दूषित पाणी आसल आणि भूतीवली गावातील ग्रामस्थ पीत असून आदिवासी वाडयांना देखील दूषित पाणी पोहचत आहे.
ही योजना ज्यांच्या कार्यकाळात आली त्यावेळचे सरपंच यशवंत कोंडे हे पाली भूतीवली धरणाच्या खाली असलेली विहिर पाहण्यासाठी गेले असता त्यांना धक्का बसला आहे.विहिरीचा स्लॅब फोडून नाल्याचे पाणी विहिरीत जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे.त्यामुळे माजी सरपंच कोंडे यांनी आसल ग्रामपंचायतीचे प्रशासक सुशांत गोरे आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता या दोन्ही अधिकाऱ्यांनी माजी सरपंच कोंडे यांचे फोन कॉल घेतले नाहीत.त्यामुळे कोंडे यांनी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांना संपर्क करून सर्व माहिती दिली आहे.
दूषित पाणी जात असल्याच्या तक्रारी आल्यावर ग्रामपंचायत अधिकारी यांना पाण्यात टीसीएल पावडर टाकण्यास सांगितले आहे.त्याचवेळी नाल्याचे पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी विहिरीला पडलेले छिंद्र बिजवण्यास सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासक सुशांत गोरे यांनी दिली.
आम्ही अनेक दिवस दूषित पाणी पीत असून त्या पाण्यामुळे आमच्या गावातील अनेकांना आजार झाले आहेत.त्यामुळे आम्ही विहिरीवर जावून पाहिले असता धक्का बसला आहे.शासनाने या प्रकरणाची चौकशी करावी आणि ग्रामस्थांना दूषित पाण्यापासून वाचवावे,अशी प्रतिक्रिया माजी सरपंच यशवंत कोंडे यांनी दिली.






