शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढला
कागल: सरकारने कोणाचीही मागणी नसताना ८६ हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला आहे. या मार्गात शेतकऱ्यांची २८ हजार हेक्टर शेती बाधित होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन रस्त्याखाली गाडून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. या मागणीसाठी कागल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला.
बुधवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चेकरांच्या हातात शक्तिपीठ विरोधी तसेच शासनाच्या निषेधाचे फलक घेतले होते. प्रचंड घोषणाबाजी करत हा विराट मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ समर्थनार्थ एक हजार शेतकऱ्यांनी सह्या दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. परंतु कागल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्ती महामार्गाच्या विरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे हरकती दिल्या होत्या. त्याच्याच झेरॉक्स प्रति तहसीलदारांना देण्यासाठी आणि या महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमरीश घाटगे म्हणाले शासनाने अंबाबाई तुळजाभवानी यासह इतर सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करावा त्यामुळे रोजगार उत्पन्न होईल. देवाच्या नावावर शक्तिपीठ महामार्ग करण्यास आमचा विरोध आहे. या मार्गाची शेतकऱ्यांवर जबरदस्ती झाल्यास शेतकऱ्यांना जनावरांचे लोढणे हातात घ्यावे लागेल, तालुक्यातील एक इंच ही जमीन आम्ही देणार नाही. कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील हरकती आम्ही तहसीलदारांना दिले आहेत.
Shaktipeeth ExpressWay: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; तब्बल 12 हजार शेतकरी उचलणार ‘हे’ पाऊल
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता महसूल विभागाला याबाबत विचारून घ्यावे. सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये त्यांच्या पैशाला आम्ही बोलणार नाही. आमची जमीन आम्ही देणार नाही. शरद पवार पक्षाचे शिवानंद माळी म्हणाले, कागलचे लोकप्रतिनिधी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले होते शक्तिपीठ महामार्ग झाला तर मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल परंतु मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहीन. हे स्पष्ट करत शक्तिपीठ महामार्ग सांगली पर्यंत आला तर कोल्हापूर जिल्ह्यात त्याला ताकतीने विरोध करू.