चौक बाजारपेठ व सभोवतालच्या 18 ते 20 वाड्या-वस्त्या, व आजूबाजूच्या 9 ते 10 गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले ग्रामीण रुग्णालय चौक हे परिसरातील रुग्णांसाठी जीवनरेषा किंवा संजीवनी ठरत आहे. ग्रामीण रुग्णालय चौक येथील वैदयकीय अधिक्षक डॉ. सविता काळेल पदभार स्विकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येते.मोहोपाडा रसायनीसह तालुक्यातील मागील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळाला आहे. रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स, डेंटिट्स आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे रुग्ण संख्येत प्रचंड वाढ दिसून आली. बाह्यरुग्ण विभागात दिवसाला किमान180 ते 200 रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच ज्या रुग्णांना रुग्णालयात भरतीची आवश्यकता असते अशांना रुग्णालयात भरती करून पुढील उपचार दिले जातात. त्यांचीही संख्या महिन्याला सरासरी 450 ते 500 असत. आंतररुग्णांसाठी रुग्णालयात सकस आहार, चहा नाश्ता, पुरिफाईड पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डात टि. व्ही.संच व प्रत्येकाला आयुर्वेदाची माहिती व्हावी यासाठी हर्बल गार्डनही तयार करण्यात आले आहे.
आंतररुग्णांमध्ये प्रसुती महिलांचे प्रमाण देखील वाढले आहे, ते महिन्याकाठी 40 ते 45 असून सर्वा प्रसूत महिलेची व बाळाची बारकाईने सुश्रूषा केली जाते.चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सविता काळेल या स्वतः बालरोगतज्ञ आहेत.त्यांच्या उपास्थितीमध्ये लहान मुलांची तपासणी, संगोपन, आहार यावर त्या सल्ला देतात. ज्या बाळांमध्ये कावीळचे प्रमाण दिसून आल्यास अशांना फोटोथेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात.तसेच रुग्णालयातील विविध विभागांमार्फत रुग्णांना सेवा देण्यात यात प्रयोगशाळा विभाग, दल-किरण, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, एच. आय. व्ही. तपासणी व समुदेशन आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) पथक यांचे अंतर्गत खालापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळकरी मुलांचे आरोग्य तपासणी असा करण्यात येते. एखादा अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात भरती केले जाते तर मृतकांना शवविच्छेदनाची सुविधा आहे.तसेच रात्री अपरात्री सर्पदंश, विंचूदंश, प्रसुतपिडा अशा अडचणीच्या वेळी रुग्णालयीन कर्मचारी तत्पर असून योग्य त्या सेवा देण्याचे काम अविरत चालू आहे.रुग्णांना मोफत जेवण दिले जाते.
सामाजिक बांधित्रकी जपण्याचा व रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी ” अल्काईल अमाइन्स केमिकल्स लि. पाताळगंगा” “सिपला केमिकल्स प्रा.लि. रसायनी,” टाटा स्टील खोपोली, ” ” ग्रेसफूल हैण्डसू संस्था पनवेल ” यांचेकडून मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे डाॅ.सविता काळेल यांनी सांगितले.येणाऱ्या रुग्णांना ‘ग्रामीण रुग्णालय चौक हे हॉस्पिटल नसून एक प्रकारे आपले घरच आहे, असा अनुभव येत आहे. यावर पंचक्रोशित ग्रामीण रुग्णालय चौक हे खाजगी रुग्णालयापेक्षा उत्तम सुविधा मोफत पुरवित असल्याने हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे.