मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra- Karnataka Border) प्रश्न पेटलेला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना (Maharashtra Chief Secretary) पत्र पाठवून या वादाला रंग दिला आहे. सीमाप्रश्नी समन्वयक असलेले मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) ६ डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत. या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नये, असे पत्र बोम्मई यांनी पाठवले आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ गावांवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी हक्क सांगितला आहे. या गावांसाठी पाणी सोडून मुख्यमंत्री बोम्मई यांनी या सर्व गावांवर हक्क सांगितल्याने हा सीमावाद अधिकच तापला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील व देसाई बेळगावला जात आहेत.
४३ गावांच्या पाणी योजना मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश जत (जि. सांगली) तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना युद्धपातळीवर पूर्ण करा. तसेच, येथील गावागावातील पाणीपुरवठा योजनांसाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, यासाठी पुरेसा निधी मिळेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. जतच्या या ४३ गावांनी पाणी तसेच इतर सोयीसुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.