करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. याविरोधात धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज अखेरची सुनावणी पार पडली. माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा दणका दिला आहे. कोर्टाने मुंडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यावर आता करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझगाव कोर्टाने दिलेल्या निकालावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, ‘मला न्याय मिळाला. त्यासाठी मी न्यायालयाचे आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. महिलांसाठी ही एक आदर्श अशा स्वरूपाची केस आहे. माझ्यासारख्या एका साधारण महिलेने मंत्र्याला हरवले आहे. मीच धनंजय मुंडे यांची खरी पत्नी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’
पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, ‘करुणा मुंडेला प्रेमात अडकवून लग्न केल्यास लाखों रुपये देण्याचे कारस्थान सध्या रचले जात आहे. धनंजय मुंडे यांची गॅंग हे करत आहे. धनंजय मुंडेंकडे एवढे डोके नाही. धनंजय मुंडे विरुद्ध बोलू नकोस नाहीतर तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाऊ अशा स्वरूपाच्या धमक्या प्राप्त होत आहेत. ‘
कोर्टात काय झाले?
वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज अखेरची सुनावणी पार पडली. दरम्यान माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे, माझगाव कोर्टाने वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान धनंजय मुंडे हे माझगांव कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडून करुणा मुंडे या पोटगीची रक्कम वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन ते चआर सुनावणी पार पडल्या. दरम्यान अखेरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे. त्यामुळे वांद्रे कोर्टाचा करुणा मुंडे यांना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश कायम ठेवला आहे.