करुणा मुंडेंचा मोठा गौप्य्स्फोट (फोटो- सोशल मीडिया)
Honey Trap: महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केला होता. मुंबई, ठाणे, नाशिक, हनी ट्रॅपची केंद्रं बनली आहेत. यासंदर्भातील माझ्याकडे पेन ड्राइव्ह आहे आणि सरकारचं मत असेल तर आम्ही तो दाखवू शकतो, असं नाना पटोले यांनी म्हटलं होत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला होता. दरम्यान हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे.
करुणा मुंडे यांनी पिडीतेसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या पीडित महिलेने अनेक गोष्टी मांडल्या आहेत. करुणा मुंडे यांनी हा हनी ट्रॅप नसून पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. ‘होमगार्ड आलेल्या महिलेवर दोन एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यानी लैंगिक अत्याचार केला आहे. तिने तक्रार दाखल करू नये म्हणून पोलिसांनी तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. तिच्या मुलींना देखील त्रास देण्याचे काम सुरु आहे. गेले सहा महिने हि पीडिता न्यायासाठी दाद मागत आहे. मात्र तिची मदत करायला कोणीही तयार नाही. या प्रकरणात एसीपी आरोपी असल्याचे तिची मदत करायला कोणी तयार नाही, असे करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
पीडिता काय म्हणाली?
ठाणे शहरातील एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने माझ्याशी ओळख केली. मी तुम्हाला ओळखतो, असे सांगून त्याने माझा मोबाईल नंबर मागितला. मोबाईलवर तो चांगले मेसेज करत होता. एके दिवशी त्याने मला त्याच्या घरी बोलावले. तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावे अशी बायकोची इच्छा असल्याने सांगत त्याने एका महिलेशी बोलणे करून दिले. मी बायको आपल्याशी बोलली आहे समजून त्याच्या घरी गेले. तिथे गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने आणि आणखी एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.
नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ
राज्यातील काही मंत्री, ७२ हून अधिक अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांची गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही. त्यामुळे मी हा विषय विधानसभेत मांडत आहे, असे पटोले म्हणाले. हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मुव्हमेंटच्या हाती चालली आहेत. मला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नसून या सगळ्याबाबत सरकार गंभीर नाही. साधं निवेदनही द्यायला तयार नाही. त्यामुळे अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती नाना पटोलेंनी केली होती.
फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण
एक गोष्ट या सभागृहात मांडली जात आहे. ती म्हणजे हनी ट्रॅप. आता कुठला हनी ट्रॅप यांनी आणला ते समजतच नाही. नाना पटोले यांनी कोणता बॉम्बच आणला म्हणे. तो बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आणि ना ट्रॅप आहे. नाना पटोले, कोणती घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. आता आजी-माजी मंत्री सगळे एकमेकांकडे पाहत आहेत. कोणत्याही आजी-माजी मंत्र्यांची हनी ट्रॅपबाबत तक्रारही नाही. पुरावेही नाहीत जाणीव अशी घटनाही समोर आलेली नाही.