रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Chiplun Khadpoli bridge collapsed : रत्नागिरी : लवकरच गणेशोत्सव सण साजरा केला जाणार आहे. यासाठी पुणे मुंबईहून गावी जाणाऱ्या चाकरमान्याची संख्या लक्षणीय असते. अनेक जण रेल्वेचा प्रवास करतात. तर काही जण हे रस्त्याच्या मार्गाने देखील गावाकडे मार्गस्थ होत असतात. पण गावांकडे सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्या कोकणकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला असल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला आहे. पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा 23 साखळी क्रमांक 1/00 खडपोली पूल कोसळला आहे. ही दुर्घटना काल (दि,23) रात्री 10.30 वाजतच्या सुमारास घडली असून पूल कोसळला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे., या पुलाच्या दुर्घटनेमुळे पिंपळी-खडपोली-दसपटी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चिपळूणमधील खडपोली पूल हा 1971 मध्ये बांधण्यात आला होता. वीस मिटर लांबीचा हा पूल सध्या कमकुवत झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीची मागणी होत होती. त्यामुळे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे 5 जुलै रोजी चिपळूण येथे सहकार भवन येथे आलेले असताना त्यांनी घेतलेल्या बैठकीत हा पूल एमआयडीसी कडून उभारण्यात येईल असे सांगून अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या.
नवीन पूलाचा प्रस्ताव अन् निधी मंजूर
हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी सी कडे हस्तांतरित केलेला होता. पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील ‘सहकार भवन’मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते. पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, पावसाळ्यानंतर काम सुरु झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासाही आरामदायी राहिलेला नाही. प्रचंड गर्दीमुळे रेल्वे प्रवासामध्ये अनेक गैरसोयी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि कोकण विशेष एक्सप्रेससारख्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात कोकणवासीय प्रवास करतात. मात्र, या गाड्यांमध्ये इतकी गर्दी झाली आहे की प्रवाशांना उभे राहायला देखील जागा मिळत नाही.