जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम पीकांचे पूर्णपणे नुकसान झाले (फोटो - सोशल मीडिया)
शाम सोनवणे । जळगाव : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. आधी पावसाने दिलेला दगा, नंतर अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस या तिहेरी आघाताने शेती पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. कपाशी, मका, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या सर्व पिकांचे नुकसान अपरिमित आहे. अस्मानी संकटांचा सामना करत असलेल्या जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा या दोन तालुक्यांवर सुल्तानी अन्यायही झाला आहे. त्यातच चोपडा तालुक्यावर दुहेरी अन्याय झालेला आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटना आपत्ती सानुग्रह आणि आपत्तीग्रस्त उपाययोजनांच्या प्रतीक्षेत आहेत. आम्हाला झुलवत ठेऊ नका, दिलासा मिळेल की नाही? ते सांगा अशी रास्त मागणी पीडित शेतकऱ्यांची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे आहे.
यासाठी मोठा संघर्ष उभा केला असला तरी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या आक्रोशाची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. माय मरो पण आशा न मरो अशी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. संघर्ष करणाऱ्यांच्या पदरात काय पडते, पडते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच चोपडा तालुक्यातील शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या तिहेरी संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याची मागणी शेतकरी कृती समिती करत आहे. पूर्वी चोपडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला होता, परंतु नंतर नाव वगळण्यात आले. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करूनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासह अमळनेर तालुक्यातील शेतकरीही विविध मागनि सानुग्रह प्राप्तीसाठी लढा देतांना दिसत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शेतकरी कृती समितीचे सदस्य एस. बी पाटील म्हणाले की, सरासरीपेक्षा जास्त पाऊस तालुक्यात झालेला आहे, तालुक्यातील माती प्रामुख्याने रायचिकन असल्याने सततच्च पावसात निचरा न होऊन पिके पूर्णपणे नष्ट झाली. आता गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस काळा पडला असून सरकी सडली आहे. त्यामुळे चोपडेकर शेतकरी आर्थिकदृष्ट्य पूर्णपणे कोलमडला आहे. मात्र प्रशासनाच्य ब्लेखी येथे सरासरी शंभर टक्क्यांपेक्षा कम पाऊस आहे. आमदार चंद्रकांत सोनवण म्हणतात, की माझ्यास्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना याबाबत निवेदन देण्यात आलेले आहेत. उभयंतांकडून ‘प्रयत्न करू’ असे सांगितले जात आहे. आमदार अनिल पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याप्रश्नी भेटलेत आणि दत्तात्रय भरणेंना साकडे घातले, मात्र दिलासा मिळेल की नाही हे उत्तर कोणाकडूनही मिळू शकलेले नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जिल्ह्यातील नेते राज्यात पॉवरफुल
एकाच जिल्ह्यातील दोन तालुक्यासाठी वेगळा न्याय. त्यातच उभ्या पिकांचेच पंचनामे होतात. लावल्या जात असलेल्या वेगवेगळ्या निकषांमुळे शेतकऱ्यामध्ये खदखद आहे. त्यातच आता आचारसंहितचे पालुपद पुढे रेटले जाण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांच्यासारखे राज्यातील प्रभावी नेते जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या जिल्ह्यातील दोन तालुक्यांवर अन्याय होत आहे याचे सोयरसुतक त्यांना नसावे का? जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुलूख मैदान तोफ म्हणून नावाजलेले आहेत. ते न्याय देऊ शकत नाहीत का?. अनिल पाटील आणि चंद्रकांत सोनवणे यांना भविष्यातही राजकारणच करायचे आहे ना? मग शेतकऱ्याच्या प्रश्नी राजकारण करू नका. खोट्या आशेवर झुलवत मदत आणि उपाययोजना मिळणार असतील तर हो म्हणा नसतील मिळणार तर नाही सांगा. देवण्यापेक्षा एकदाचाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाका. मदत आणि उपाययोजना मिळणार असतील तर हो म्हणा नसतील तर नाही सांगा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






