प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी (फोटो- सोशल मिडिया)
कोल्हापूर: छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला सोमवारी तेलंगणा येथे कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आज सकाळीच त्याला कोल्हापूरात आणण्यात आले आहे. दरम्यान आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. दरम्यान कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत कोरटकरला पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याला कोर्टाबाहेर आणण्यात आले. त्यावळेस शिवप्रेमी त्याच्यावर धावून गेले. मात्र सतर्क असलेल्या ऑलिसांनी वेळीच त्यान रोखले आणि पुढील प्रसंग टळला.
प्रशांत कोरटकर काँग्रेसच्या नेत्याच्या घरी लपून होता?
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर कोर्टाकडून आधी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र तो पोलिसांकडे कोणताही जबाब देण्यासाठी न आल्यामुळे त्याला अटक करण्याचे कोल्हापूर कोर्टाकडून आदेश देण्यात आले होते. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे. मात्र तो कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
प्रशांत कोरटकरला अटक करण्याच्या मागणीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन देखील करण्यात आले. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांसह कॉंग्रेस नेते देखील उपस्थित होते. कॉंग्रेस नेत्यांनी प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आता भाजप नेते परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत कोरटकर काँग्रेसच्या नेत्याच्या घरी लपून होता, असा गंभीर आरोप परिणय फुके यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता. मात्र, विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते.






