कोल्हापूर : खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापूर विमानतळावरून मंगळवारी मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणारा निधी देऊ, असे आश्वासन दिले.
गेल्या काही महिन्यापासून बहुचर्चित असलेला आणि बहुप्रतिक्षित असणाऱ्या कोल्हापूर विमानतळावरून मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. स्वागत संजय घोडावत यांनी केले. शाहू महाराजांनी हिरवा झेंडा दाखवून विमानसेवेचे उद्घाटन केले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अतिरिक्त सचिव उषा पाटील, केंद्रीय मंत्री सिमरन सिंग, छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, संजय. डी. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, स्टार एयरचे चेअरमन संजय घोडावत आदी उपस्थित होते.
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, कोल्हापूर शहराला ऐतिहासिक नगरी म्हणून महत्व प्राप्त झाले आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास, शक्ती आणि समाज रचनेची विचारधारा, प्रगती, विकास ,सकारात्मक दृष्टिकोन येथील राजांनी दिलेला आहे. ८० वर्षांपूर्वी छत्रपती राजाराम महाराजांनी विमानसेवा सुरू केली. त्यानंतर आजही विमानसेवा सुरू आहे. भविष्यात या विमानतळाचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. विकासासाठी लागणारा निधी केंद्रातून आपण देऊ असे त्यांनी सांगितले.
धैर्यशील माने म्हणाले, की संजय घोडवत यांच्या संजय नावामध्ये सतेज पाटील यांच्या नावातील ‘स’ आणि धनंजय महाडिक यांच्या नावातील ‘जय’ असा उल्लेख आहे. त्यामुळे माने यांनी दोघांच्या नावाचा धागा जोडताच खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावण्याची संधी सोडली नाही.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, विमानतळाच्या या कार्यक्रमाची एक जाहिरात देण्यात आली. त्यामध्ये धनंजय महाडिक वगळता जिल्ह्यातील सगळे नेते आहेत. समस्त कोल्हापूरकर या नावाने ही जाहिरात दिली आहे. मात्र, काम केलं असलं, की जाहिरात करण्याची गरज नाही. त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला. आमदार हसन मुश्रीफ यांनी ६४ एकरचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. संजय घोडावत ग्रुपची ही सेवा थेट न्यूयॉर्कपर्यंत पोहचावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी
व्यासपीठावर राजकीय टोलेबाजी चांगलीच रंगली. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर विमानतळावरून राजकीय कुरघोडी रंगल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. तो सुद्धा यावेळी पुन्हा एकदा दिसून आला.
मंगळवार, गुरुवारी, शनिवारी सेवा
कोल्हापूर ते मुंबईसाठी २ हजार ५७३ रुपये इतका तिकीट दर असणार आहे. हे विमान मुंबईतून सकाळी १०.३० वाजता टेकऑफ होऊन कोल्हापुरात ११.२० वाजता लँडिंग होईल. कोल्हापुरातून सकाळी ११.५० वाजता टेकऑफ तर मुंबईत १२.४५ वाजता लँडिंग होणार आहे. दुसरीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरातून तिरुपती, बंगळुरू, अहमदाबाग, हैदराबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
पर्यटन, उद्योग, कृषी क्षेत्राला चालना
केंद्र शासनाच्या अंतर्गत स्टार एयरच्या वतीने विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर मुंबई या मार्गासाठी २५७३ रुपये इतकी तिकीट दर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावर विमान प्रवास करता येणार आहे. ही विमान सेवा सुरू झाल्याने आता कोल्हापूरच्या पर्यटन, व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राला यामुळे चालना आता मिळणार आहे.
उड्डाण होताना वॉटर सॅल्यूट
कोल्हापूर मुंबई ही विमानसेवा स्टारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्याने पहिली ४७ सीटरचे पहिले विमान उड्डाण होत असताना वॉटर सॅल्यूट देण्यात आला. यावेळी अनेकांचे भुवया उंचावल्या. विमानसेवा सुरू होणार असल्याने विमानतळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.






