संग्रहित फोटो
कोल्हापूर : सध्या वाईनची सुपरमार्केटमध्ये विक्री (Wine Selling Issue) करण्याची परवानगी दिल्यावरून वाद सुरू आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी स्वतः वाईन पिण्याचे समर्थन करणार नाही. मात्र, डॉक्टरांनी सुद्धा सांगितले आहे की कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती योग्य आहे’.
कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय दारूला प्रोत्साहन देण्यासाठी नाही. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. यावेळी मास्कमुक्तीबाबतसुद्धा निर्णय घेणार आहे. ज्या राष्ट्रांनी मास्कमुक्त केले आहे, त्यांनी नेमके काय शास्त्र वापरले याचा अभ्यास करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अनेक चांगल्या संस्थांनी राज्याचे कौतुक केले.
कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी तर या काळात कोरोना उपाययोजनांसाठी तिजोरी रिकामी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी त्यांनी प्राधान्य दिले. अनेक चांगल्या संस्थांनी राज्याचे कौतुक केले आहे. आम्ही आमच्या परीने जमेल तेवढे काम केले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरविल्याचे विधान केले होते.