योगी आदित्यनाथ यांची महाविकास आघाडीवर टीका (फोटो- ट्विटर)
कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी कोल्हापुरात प्रचारसभा घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
जातीच्या नावावर वाटण्या करणाऱ्या काँग्रेसने देशासोबत विश्वासघात केला. काँग्रेसचे अस्तित्व आता संपवण्याची वेळ आली आहे, महाराष्ट्राची ही निवडणूक राज्यापूरती मर्यादित राहिली नसून देशासाठी सुद्धा महत्त्वाची आहे .जाती-जातीत फूट पाडून आपली पोळी भाजण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. देश आणि महाराष्ट्र एकसंग राहावा ; यासाठी आम्ही बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला आहे. कोल्हापूरकरांनी भ्रष्टाचारी, खोटारड्या महाविकास आघाडीला हद्दपार करावे. महायुती भक्कम करावी असे आव्हान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी आजच्या सभेत केले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तपोवन मैदानावर सभा पार पडली. या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली होती. ‘बटेंगे तो कटेंगे’ ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे. माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही. १९४७ पासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती.
हेही वाचा: आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात ! योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
मात्र, काँग्रेसने देशासोबत धोका केला. आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी विरोधात आहे. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारताच्या सीमा सुरक्षित आहे. ५०० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. हा डबल इंजिन सरकारचा लाभ आहे. सर्व समस्यांचे समाधान केवळ डबल इंजिन सरकार असू शकते, या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांसमोर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या उमेदवारांचे आव्हान आहे. काँग्रेसच्या विकासाच्या अजेंड्यावर गरीब, तरुण आणि महिला वर्ग कधीच नव्हता. त्यांनी आजवर केवळ जात, धर्म आणि भाषेच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचे काम केले आहे. प्रथम देशाला आणि नंतर समाजाला विभागण्यात आले आहे. काँग्रेसला देशात सर्वाधिक काम करण्याची संधी मिळाली असली, तरी त्यांनी काहीही केले नाही त्यांना ६५ वर्षात जमले नाही ते भाजपने करून दाखवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा संदेश दिला होता. त्यावरूनच आपल्याला बटेंगे तो कटेंगेची प्रेरणा मिळाली असल्याचे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले. शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की, संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्याला नवी प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. प्रत्येक भारतवासीयाला आपल्या सेनेचा हिस्सा बनवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचं प्रदर्शन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.