शिरोळ : एसटी विलीनीकरणसाठी आर्थिक तरतुदीसह कॅबिनेटची मंजुरी मिळावी. राज्य शासनाने एसटी महामंडळाचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, या मागणीसाठी कुरुंदवाड एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य व सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन दिले.
शिरोळ तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात कार्यक्रमासाठी राज्यमंत्री पाटील दौऱ्यावर जात असताना एसटी कर्मचाऱ्यांनी शिरोळ जनता हायस्कूल येथे त्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री पाटील यांनी कॅबिनेटमध्ये सकारात्मक निर्णय होईल, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कुरुंदवाड एसटी आगाराचे कर्मचारी निनाद भोसले, शशिकांत राजमाने, संजय देवकाते, राजेंद्र कांबळे, गणेश शेडबाळे, गजानन जुगळे, सचिन परीट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.