पन्हाळा पावनगड परिसरात बिबट्याचा वावर (फोटो- सोशल मीडिया)
पन्हाळा: पन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये असलेली जंगलं त्यामुळे वन्य प्राण्यांचे दर्शन हे अधून मधून होतच असते. पन्हाळा पावनगड दरम्यान रस्त्याच्या रेडीघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्यांचा या परिसरात वावर वाढल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा पन्हाळ्यातील हाजी सलीम खान, मोहसिन मुजावर, हे पावन गड येथून परत पन्हाळ्याकडे येताना त्यांना वाटेत बिबट्याचे दर्शन झाले.
हा बिबट्या रस्त्यावरून जात होता चार चाकी च्या हेडलाईटच्या प्रकाशात हा बिबट्या त्यांना दिसला. गाडीला पाहताच तो जागेवरच थबकला. त्यानंतर तो रस्त्याच्या दक्षिण बाजूला निकम वाडीच्या दिशेने गेल्याचे अनेक लोकांनी सांगितले. पूर्ण वाढ झालेला हा बिबट्या अंदाजे साडेसहा फूट लांब, व चार साडेचार फूट उंच आहे.
आज अनेक ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पावनगड वाशी यांना या रेडीघाट मार्गावरून एकच रस्ता असल्याने ये -जा करा लागते. त्यांचा प्रवास भीती दायक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. बिबट्याच्या वावरामुळे अनेक प्राणी मित्र बिबट्याच्या दर्शनासाठी येथे हजेरी लावत आहेत. बिबट्याचा वावर म्हणजे या भागात जंगल क्षेत्रात वाढ झाल्याचे संकेत समजले जातात. ही अभिमानाची गोष्ट असली तरी या बिबट्याकडून मानवी हल्ले होऊ नयेत अशी चर्चा लोकांच्या मध्ये सुरू आहे. या बिबट्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.






