नाशिक : पाऊस असो की उन्ह किंवा वादळं-वारं याची पूर्वकल्पना, माहिती हवामान विभागाने मिळते. त्यानुसार, हे अंदाज खरे देखील ठरतात. पण आता कुठेही चेंगराचेंगरी होणार अशी पूर्वसूचना (Stampede Alert) मिळू लागली तर नक्कीच उद्भवणाऱ्या आपत्तीला ब्रेक लावता येईल. हे अशक्य वाटत असले तरी ते शक्य होऊ शकणार आहे. कारण चेंगराचेंगरीच्या संदर्भातली पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित होऊन आनंददायक गोष्ट म्हणजे या संशोधनाला राष्ट्रीय पेटंट (National Patent) मिळाले आहे.
आपल्या देशात अनेक तीर्थस्थळे आहेत. तेथे दरवर्षी कुठली ना कुठली यात्रा भरते किंवा गर्दी होत असते. यात्रेसह वेगवेगळ्या कारणांनी होणारी जनतेची गर्दी आणि त्यामुळे होणारी चेंगराचेंगरी गंभीरच आहे. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिव्हाईस (एएसएडी) एकलहरे-नाशिक येथील उपप्राचार्या प्रा. डॉ. वर्षा पाटील व प्रा. डॉ. स्वाती भावसार यांनी संशोधन करून अँटी स्टेमपेड अलर्ट म्हणजे चेंगराचेंगरी टाळण्याबाबत सूचना देणारी यंत्रणा विकसित केली आहे.
भारतात अतिशय उपयुक्त
या संशोधनाद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी दिवा. अलार्म, मोबाईल अलर्ट तसेच मोबाईल अॅपद्वारे त्यांना गर्दीची पूर्वसूचना आधीच मिळते. ही नवसंशोधित प्रणाली विविध ठिकाणी फार उपयुक्त ठरणारी आहे. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळे विविध प्रकारच्या मंदिरांमध्ये तसेच यात्रांच्या ठिकाणी व सर्व गर्दीची ठिकाणावर उपयोग होऊ शकतो.
पोलिस दल, अग्निशामक दल, रेल्वे सुरक्षा दल, एनडीआरएफ अशा सर्व विभागांना तसेच नागरिकांना योग्य वेळी सतर्क करण्याचे काम ही यंत्रणा करू शकते, त्यामुळे उपयुक्तता जास्त आहे. संशोधकांनी या उपकरणाचा व्यवसाय उपयोग करण्याचाही मानस व्यक्त केला आहे.
तंत्रज्ञानाचा आधार घेतला गेला पाहिजे
भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये अतिशय उपयुक्त ठरणारी यंत्रणा आहे. संशोधनाच्या मागची पार्श्वभूमी बघितली असता नाशिकमध्ये मागील कुंभमेळ्यात झालेली दुर्दैवी चेंगराचेंगरी अथवा एलफिस्टन रोड मुंबई स्थानकात झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये. याकरिता तंत्रज्ञानाचा आधार घेतला गेला पाहिजे व मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा विचार मनाशी पक्का करून मागील पाच वर्षापासून अशा प्रकारच्या चेंगराचेंगरी टाळण्यासाठी यंत्रणा विकास करण्याचे काम हाती घेऊन त्यावर प्रयोग सुरू होते.