नाशिक : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, कांदा अनुदान (Subsidy for Onion) शेतकऱ्यांना मिळण्यास सुरवात झाली आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्याचे काम बुधवारी उशिरापर्यंत सुरू होते. हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असेल किंवा काही टेक्निकल अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको, याबाबत संबंधित यंत्रणेला देखील सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
जिल्हा बँक कात टाकणार
नाशिक जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. या बँकेला वाचविणे गरजेचे आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जवळपास ६८ वर्षाची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकामध्ये गणली जाते. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केलेले आहे. जिल्ह्याच्या विकासात या बँकेची भूमिका महत्वाची राहिली आहे. बँक उभी राहण्यासाठी सर्व स्थरावर आपले प्रयत्न सुरू आहेत.