मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या तलाव आणि धरणांत केवळ 55 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्या 3 वर्षांतील हा सर्वात कमी पाणीसाठा असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं हवामान विभागानं यंदा मान्सून मुंबईत उशिरा सक्रिय होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या (BMC) चिंतेत भर पडलेली आहे. सध्या मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट तूर्तास नसलं, तरी जूनमध्ये तलाव आणि धरण क्षेत्रांत पाऊस झाला नाही तर मात्र पाणीकपातीला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानंच ही माहिती दिलीय.
सध्या प्रत्येक दिवशी सात तलाव आणि धरणक्षेत्रातील पाण्याचा आढावा घेण्यात येतोय. मुंबईला दररोज 3850 एमएलडी पाणी पुरवण्यात येतं. सध्या धरणक्षेत्रांत 212433 एमएलडी पाणी शिल्लक आहे. सध्या 55 दिवसांचा पाणीसाठी आहे, यातील 10 टक्के पाणी हे राखीव ठेवण्यात येतं.
गेल्या 3 वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा
सध्याच्या स्थितीत शनिवारपर्यंत एकूण क्षमतेच्या केवळ14 टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 19 टक्के होता. तर 2021 साली हा आकडा 15 टक्के होता.
राखीव पाणी वापरण्यासही सरकारची परवानगी
धरणक्षेत्रांतील पाणीसाठा घटत असल्यानं राखीव पाणी वापरण्याची परवानगी महापालिकेनं सरकारकडं मागितली होती. हे पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आरक्षित जलसाठ्यातून प्रतिदिन 150 एमएलडी पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.