नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर (Maharashtra Lokayukt Bill) करण्यात आले. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपावरून सभात्याग केला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने विरोधकांच्या गैरहजेरीत चर्चेशिवायच हे विधेयक मंजूर केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा उल्लेख करत विधेयकावर सरकारची बाजू मांडली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सभागृहाचे मी आभार मानतो की, या लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केले. खरेतर समोरच्या बाकावरचे लोक उपस्थित राहिले असते तर अधिक आनंद झाला असता. आम्ही या विधेयकावर विरोधकांशीही चर्चा केली होती. त्यामुळे असते तर या विधेयकावरचे एकमत आणखी व्यवस्थित दाखवता आले असते.
केंद्र सरकारने लोकपाल कायदा आणल्यानंतर देशातील राज्यांनी त्याचधर्तीवर लोकायुक्त कायदा मंजूर करावा असे अपेक्षित होते. त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले. तेव्हा मी आणि गिरीश महाजन आम्ही अण्णा हजारेंकडे गेलो होतो आणि त्यांना आश्वासित केले. अशाप्रकारचा तुम्हाला अपेक्षित लोकायुक्त कायदा महाराष्ट्र सरकार तयार करेल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.