पुणे : चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर खाली येण्याची शक्यता कमीच असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. अतिरिक्त उत्पादनाशी संबंधित समस्या आणि परिस्थिती हाताळण्यासाठी पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले.
चालू हंगामात राज्यात एक हजार १८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून बहुतांशी भागात अजूनही सुमारे ९० लाख टन उसाचे गाळपासाठी शिल्लक आहे. यामध्ये मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाच्या प्रतिक्षेत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान महाराष्ट्राने याआधी २०१९-२० या हंगामात सर्वाधिक १०७ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली होती. यावर्षी ते जवळपास १३२ लाख टनांवर पोहोचले आहे, तर उत्तर प्रदेशात यावर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील विविध कंपन्यांनी १३० ते १४० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनातून ९-१० हजार कोटी मिळविल्याचा दावाही गायकवाड यांनी केला आहे.
[read_also content=”भ्रष्टाचारी कार्यपद्धती न अवलंबता ते प्रस्ताव रद्द करा; भाजपची प्रशासकांकडे मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/reject-the-proposal-without-resorting-to-corrupt-practices-bjps-demand-to-administrators-nr-267216.html”]
गाळप हंगाम लांबणार –
साधरणणे राज्यातील ऊस गाळप हंगाम हा १२० ते १४० दिवस किंवा जास्तीत जास्त १४५ दिवसांपर्यंत चालतो. मात्र, यावर्षी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २० कारखान्यांचा गाळप हंगाम १६० दिवसांपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ९० लाख टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. ज्यामध्ये एकट्या मराठवाड्यात ६० लाख टन ऊस आहे. ३१ मे पर्यंत मराठवाड्यातील उसाचे गाळप होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, तर सोलापुर जिल्ह्यातील कारखान्यांनी मराठवाड्यातून २० हजार टन ऊस गाळपासाठी उचलल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.