संग्रहित फोटो
तासगाव : निमणी (ता. तासगाव) येथील रत्नाबाई दरेकर यांच्या विहिरीवरील विद्युत कनेक्शन नसताना त्यांना महावितरण विभागाकडून ३ लाख ५० हजार रुपये बिल भरा अशी नोटीस देण्यात आली आहे. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची ही व्यथा तासगावच्या आमसभेत मांडल्यानंतर सर्वांनी एकच संताप व्यक्त केला. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरण्यात आले.
तासगाव तालुक्यातील निमणी नेहरूनगर येथे रत्नाबाई दरेकर स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी आहेत. भारत- पाकिस्तान तणावात त्यांच्या पतीने शौर्य गाजवले आहे. याबद्दल त्यांना आठ एकर जमीन दिलेली आहे. मात्र काही कारणाने त्यांना ती पिकवता आली नाही. या शेतातील विहिरीवरील मोटारीचे कनेक्शन २००३ रोजी महावितरण विभागाकडून तोडण्यात आले आहे. मात्र त्याना या विहिरीवरील मोटारीचे २०२५ पर्यंतचे बिल साडेतीन लाख रुपये आले आहे.
विहिरीवर मोटर नाही, वीजही वापरली नाही मग एवढे बिल कसे आले याचा खुलासाही महावितरण विभागाकडून केला जात नाही. फक्त पैसे भरा तेव्हाच तुम्हाला नवीन कनेक्शन मिळेल अशी अट घातली जाते. सोमवारच्या आमसभेत रत्नाबाईंनी आपल्या व्यथा व्यक्त करताचं उपस्थितांनी संताप व्यक्त केला.
स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीची अशी उपेक्षा होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल करण्यात आला. यावर आमदार रोहित पाटील यांनी या महिलेची तक्रार घेऊन महावितरण विभागाकडे खुलासा मागवला. रत्नाबाई यांनी मी एक रुपयाही भरणार नाही असे यावेळी सांगितले यावर आमदार पाटील यांनी भरू नका असे सांगितले.
प्रत्येक गावात डांबावरील बल्ब बदलण्यासाठी महावितरण विभागाचे काय नियम असतात ते कोणी बदलायचे, यासंबंधी आपण किती ठिकाणी लाईट बंद करून हे बल्ब बसवले याबाबत महावितरण विभागाकडे माहिती मागवली. ग्रामपंचायत कर्मचारी हे विद्युत खांबावर चढून बल्ब बसवू शकतात का असा प्रश्नांचा मारा माजी सभापती रवींद्र पाटील यांनी केला. यावर महावितरण विभाग हतबल झाला.