मुंबई : लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. असे असल्याने आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील जागा भरण्यासाठी महायुतीमध्ये तयारी सुरू आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना ठाकरे सरकारने आमदारांची यादी निश्चित करून ती तत्कालीन राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. राज्यात जुलै २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आधीच्या आमदारांची यादी संपुष्टात आली. मात्र, यासाठी इच्छुकांची नावे निश्चित करण्यासाठी युतीच्या नेत्यांची देखील दमछाक झाली. आता विधानसभा निवडणुकीआधी या जागांवर नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या बारा जागांपैकी भाजप सहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष इच्छुकांची नावे ठरविण्यात व्यस्त आहेत.
भाजपकडून चित्रा वाघ यांच्यासह पाच नावे चर्चेत
भाजपकडून महिला आघाडीच्या चित्रा वाघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, तसेच नाशिकचे बाळासाहेब सानप यांची नावे चर्चेत असली तरी यावर दिल्लीत निर्णय होणार आहे.
शिंदे गटाकडून शेवाळे, फाटक
शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावे चर्चेत असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे अन्य नेत्यांनी देखील फिल्डींग लावली आहे.
अजित पवार गटाकडून चाकणकर
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे, रूपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यापैकी तीन नावे निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येते.