मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु (Voting Begins) आहे. यामध्ये राजकीय, अभिनय, कलासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘उद्धव ठाकरे कधीच तोंडावर आपटले आहेत. सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील’, असे ते म्हणाले.
राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभेच्या जागा आहेत. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘गेले अनेक वर्षे आम्ही ठाण्यात काम करत आहोत. ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. मतदार आजच्या दिवसाची वाट पाहत होते. ज्यांनी टीका केली त्यांनी हत्यारं खाली टाकलेली आहेत. पराभवाची चाहूल त्यांना लागली आहे’.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशातील सर्वजण आतूर झाले आहेत. महाराष्ट्रात लोकांच्या प्रतिक्रिया मी पाहिल्या आहेत. देशाच्या विकासासाठी ही निवडणूक आहे. नागरिकांनी मतदान करत आपला हक्क बजावावा. आपलं एक मत इतिहास घडवेल. ही निवडणूक खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाची आहे. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं, असे त्यांनी म्हटले आहे.